सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खेड्यापाड्यांत पोहचवा-उद्धव
#मुंबई
कर्नाटक विधानसभेच्या निकालाने सर्व विरोधी पक्षात चैतन्य पसरले आहे. त्याचा एक म्हणून उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मोठी योजना आखली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली. शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खेड्या-पाड्यात पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बेठकीत जिल्हा प्रमुखांना दिले.
बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची तांत्रिक माहिती जिल्हाप्रमुखांना देण्यात आली. निकाल विरोधात गेला असतानाही हे लोक पेढे वाटत आहेत. हा निकाल ग्रामीण पातळी शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
शिवसेनेचा वर्धापनदिन देखील मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. मोठ्या जल्लोषात वर्धापनदिन साजरा होणार असल्याचे दानवे यंनी सांगितले.
ठाकरे यांनी बैठकीत मांडलेल्या मतावर दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्यातील शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवा. सत्तासंघर्षाच्या निकालानंतरही शिंदे गट आणि भाजप संभ्रम निर्माण करत आहे, हे लोकांना नीट समजावून सांगा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आपल्या बाजूचे सकारात्मक मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवा. प्रतोद म्हणून भरत गोगावले आणि गटनेते म्हणून शिंदेंना कोर्टानं कसे बेकायदेशीर ठरवले ते जनतेला पटवून द्या. अजय चौधरी गटनेते आणि सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद असल्याच्या वस्तुस्थितीवर कोर्टाने कसे शिक्कामोर्तब केलं आहे, ते जनतेपर्यंत पोहचवा.