संग्रहित छायाचित्र
‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यासाठी महिलांकडून पैसे घेतले जात असून त्यांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना अर्ज भरता यावा यासाठी एक नवीन अॅप तयार करण्यात आलं आहे. 'नारीशक्ती दूत' असं या अॅपचं नाव आहे. त्यामुळे अर्ज करताना आर्थिक लूट न होता, घर बसल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. हे अॅप नुकतच सुरू केल्यामुळे लॉग इन करताना किंवा प्रोफाइल अपडेट करताना काही टेक्निकल एरर येत आहेत. मात्र लवकरच हे अॅप अपडेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. तसेच ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै, २०२४ पासून दरमहा रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येईल.
नारीशक्ती दूत अॅप करा इंस्टॉल
१ ) गुगल प्ले स्टोअर वरून अॅप इंस्टॉल करा.
२) मोबाइल नंबर टाकून, आलेला ओटीपी टाकून लॉग इन करा.
३) प्रोफाइल अपडेट करा. बेसिक माहिती भरा. नाव, पत्ता, व्यवसाय इत्यादी माहिती भरा. नारीशक्ती प्रकार अपडेट करा.
४) त्यानंतर होम पेज वर येऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र?
१) २१ ते ६० वयोगटातील महिला.
२) वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.
३) या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.
४) इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
५) सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.
६) सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.