पुरवणी मागण्यांच्या शेपटामुळे वाढले कर्ज
या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, रोजगार, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. मात्र याच अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या. मात्र यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज १ लाख कोटी रुपये होणार आहे. हे कर्ज कसे फेडणार, असे अनेक सवाल राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केले. ते आज विधिमंडळात बोलत होते.
जयंत पाटील सभागृहात म्हणाले की, यावेळचा अंतरिम अर्थसंकल्प हा गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा १ लाख कोटी रुपयांपेक्षा वाढीव रकमेचा होता. राज्य सरकारने मागचा अर्थसंकल्प हा १७ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा मांडला. तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर जून महिन्यात या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांची ४४ हजार कोटींची भर घातली. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर आता काल-परवा ८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. अर्थसंकल्प मांडताना तो तुटीचा होता. तरीदेखील राज्य सरकारने १ लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. आम्ही सत्तेत असताना अजित पवारांनी २०२२ सालचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर टीका केली. आता ४० आमदार सत्तेत सामील झाले आहेत. सत्तेत येताना या आमदारांनी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्यांचे शेपूट वाढत गेले. या मागण्यांमुळे तूट वाढ वाढणार होती. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीची तरतूद या नव्या अर्थसंकल्पात आहे का? ९४ हजार कोटींची वित्तीय तूट ९९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वित्तीय तूट ही ९९ हजार २८८ कोटी रुपये आहे. म्हणजे ही तूट एक लाख कोटींच्या वरच आहे. थोडी तडजोड करून दुरुस्ती केलेली दिसत आहे. आपण बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत ही ९९९ रुपयांच्या स्वरूपात असते. मला दुकानात गेल्यावर प्रश्न पडतो की हा बूट ९९० रुपयांना का नाही. तो ९९९ रुपयांनाच का असतो. लोकांना वाटतं की तो बूट १००० रुपयांना नाही, तो ९९९ रुपयांना आहे, तोच घेऊया. अगदी तशाच पद्धतीने वित्तीय तुटीचा आकडा दाखवण्यात आला,” अशी तपशीलवार भूमिका त्यांनी मांडली.
हे कर्ज कसे फेडायचे ?
महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा आपण ८ लाख कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आहे. २०२२-२३ साली हे कर्ज ६ लाख २९ हजार कोटी होते. आता पुढच्या वर्षापर्यंत आपण हे कर्ज ८ लाख कोटींपर्यंत न्यायचे ठरवलेले आहे. हे कर्ज कसे फेडायचे हे आम्ही विचारतो तर एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची असे सांगितले जाते, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.