गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
#नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.
गडकरी यांना फोन कॉलवर धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपींनी फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतरही पुन्हा असाच प्रकार घडला आहे. गडकरींना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन कॉलवर धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरण गंभीर असल्याने गडकरी यांनी तातडीने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. गडकरी यांच्यासारखे दिग्गज आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी कशी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. दिल्ली पोलिसांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.
गडकरी यांना सातत्याने धमक्या का?
दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. पोलिसांनी आरोपींना लवकर पकडून त्यांना योग्य शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. नितीन गडकरी यांना सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांचं नेमकं कारण काय, असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
गडकरी यांना जानेवारी महिन्यात पहिली धमकी आली होती. हा फोन बेळगावच्या तुरुंगाततून गडकरी यांच्या कार्यालयात करण्यात आला होता. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आले होते. धमकी देणाऱ्या आरोपींनी १० कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. धमकी देणाऱ्या आरोपीने स्वत:चं नाव जयेश पुजारी असल्याचं म्हटलं होतं.
वृत्तसंस्था