दादा-बाबांमध्ये एकमत, नाना मात्र मेरिटवर ठाम
#मुंबई
महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच ‘‘वर्तमान राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ आहे, त्या तुलनेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरतो,’’ या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांच्या वक्तव्याशी माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सहमती दर्शवली. असे असले तरी, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळा सूर लावताना निवडणुकांसंदर्भात जागावाटपाचा निर्णय मेरिटवर होणार असल्याचे ठामपणे सांगितले.
आजघडीला आघाडीत आम्ही मोठे भाऊ आहोत, असे वक्तव्य अजित पवार यांनी अलीकडेच केले होते. अजित पवार यांचे विधान चुकीचे नसल्याचे सांगत लहान भावाची भूमिका काॅंग्रेसला मान्य असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मतदारसंघात जो पक्ष प्रभावी असेल, त्याला ती जागा देण्याची भूमिका मांडली. जागावाटपावरून आधी अजित पवार आणि ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर आता काॅंग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्येही एकमत नसल्याचे समोर आले. यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चांगलीच धूसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय राऊत यांनी ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या १९ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे, नाना पटोले यांनी जागा वाटपाबाबत प्रत्येक पक्षाने चाचपणी करावी. मात्र, जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होईल. मविआतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल त्याप्रमाणे तिथे निर्णय घेतले जातील. पारंपरिक मतदारसंघाबाबत म्हणायचे तर वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही समित्या तयार केल्या आहेत. त्यातही मेरिटच्या आधारावर चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले होते की, ‘‘तुमची ताकद जास्त असेल, तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल. पूर्वी जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायच्या. आम्हाला लहान भाऊ ही भूमिका घ्यावी लागायची. मात्र, आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत.’’ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४४, राष्ट्रवादीचे ५४, तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. एकनाथ शिंदेंनी बंड करून शिवसेना फोडली आणि ४० आमदारांसह भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यामुळे सध्या संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना असा ज्येष्ठतेचा क्रम येतो. ठाकरे गट आणि काॅंग्रेसला मात्र हा क्रम मान्य नसल्याचे त्या पक्षांमधील नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची १७ मे रोजी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्रमांक दोनवर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या. याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मध्ये राज्यातल्या २८८ विधासनसभा मतदारसंघात ४८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या नंबरची मते मिळाली. यातल्या १८ मतदारसंघात राष्ट्रवादीची थेट शिवसेनेसोबत लढत झाली. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वृत्तसंस्था