सिनेसृष्टीचा 'विश्वकर्मा' काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर एकूण २४९ कोटी रुपयांचे कर्ज होते. संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. स्टुडिओ जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता परवानगी मागणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळेच देसाई यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 3 Aug 2023
  • 12:16 pm
सिनेसृष्टीचा 'विश्वकर्मा' काळाच्या पडद्याआड

सिनेसृष्टीचा 'विश्वकर्मा' काळाच्या पडद्याआड

कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; २४९ कोटींचे कर्ज, स्टुडिओ जप्तीच्या भीतीने संपवले जीवन

#कर्जत  

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर एकूण २४९ कोटी रुपयांचे कर्ज होते. संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. स्टुडिओ जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता  परवानगी मागणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळेच देसाई यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतजवळ भव्य स्टुडिओ उभारला होता. सीएफएम या वित्तीय संस्थेकडून त्यांनी १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा दोन वर्षांत या कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु, कर्जाची वसुली होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला १८० कोटींवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह २४९ कोटींच्या आसपास पोहोचली. त्यामुळे देसाई आर्थिक विवंचनेत होते. खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातील चर्चाही केली होती.

कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज केला होता. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसंदर्भात अर्ज कार्यालयाकडे आला असल्याचे सांगितले आहे.

चित्रपट,मालिकांसाठी सेटउभारणी

 ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचे काम सुरू केले.  ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांचे कला दिग्दर्शन करताना  नितीन देसाई यांनी  भव्य सेट्स उभारले. हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ मध्ये कर्जत येथे भव्य-दिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला. 

चित्रपटातील भव्य सेटची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते. राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकेबरोबरच बालगंधर्व या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी  कला दिग्दर्शनाचे काम केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest