जुन्या मराठा कुणबींना तातडीने दाखले देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई : जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना (Maratha reservation) तातडीने कुणबी दाखले देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पीटिशनच्या माध्यमातून मराठा आरक्षण (Maharashtra News) मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले .
मराठा आरक्षणावरून राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यात आज झालेल्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरक्षणासंदर्भात अहवाल सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरक्षणासाठी जरांगे पाटील दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला बसले आहेत. त्याच आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, या बैठकीत मी सहभागी झालो होतो. त्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती. जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्या समितीने आमच्याकडे अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आम्ही उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून स्वीकारू आणि पुढील प्रक्रिया करु.
मुख्यमंत्री म्हणाले की, शिंदे समितीने १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये ११ हजार ५३० कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यांनी फार जुने जुने रेकॉर्ड तपासले, उर्दू आणि मोडी लिपीतील रेकॉर्ड तपासले, हैद्राबाद येथील जुने पुरावे, नोंदी यासाठी विनंती त्यांनी केली आहे. त्याच्यामध्येही आणखी काही कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता असून त्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. शिंदे समितीने अनेक पुरावे तपासले. शिंदे समिती चांगले काम करत आहे.