संग्रहित छायाचित्र
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागलेले आहेत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी यापूर्वीच सीईटी परीक्षा पार पडल्या असून, अनेक परीक्षांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत.
पुढील आठवड्यात १० जूनपासून सीईटी परीक्षांच्या निकालाचा धडाका सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशासाठी मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सीईटी परीक्षा पार पडत आहेत.
वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी एकूण २२ सीईटी परीक्षांचे आयोजन सीईटी सेलतर्फे केले होते. यापैकी दहापेक्षा अधिक सीईटी परीक्षांचे निकाल यापूर्वीच जाहीर झालेले आहेत. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेल्या एमएचटी-सीईटी यांसह अन्य काही सीईटी परीक्षांच्या निकालाची विद्यार्थी, पालकांना प्रतीक्षा लागून आहे. प्रवेशप्रक्रियेचे नियोजन करायला सोपे व्हावे, या उद्देशाने सीईटी सेलने निकालाच्या संभाव्य तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार आता पुढील आठवड्यापासून निकालाचा धडाका सुरू होणार आहे. (CET Result 2024)
पदव्युत्तरच्या प्रवेशाकडे लक्ष
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झालेला असल्याने पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेशाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. मात्र राज्यातील अनेक विद्यापीठांकडून पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केलेले नाही. अशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाला तरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पदवीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता या निकालास किती विलंब होतो, याकडे लक्ष लागून राहणार आहे.
सीईटी परीक्षा निकालाची संभाव्य तारीख
एमएचटी-सीईटी - १० जून
बीए/बीएस्सी-बीएड सीईटी - १२ जून
बीएचएमसीटी सीईटी - ११ जून
डीपीएन/पीएचएन - १२ जून
एमएचएमसीटी-सीईटी - १३ जून
नर्सिंग सीईटी - १६ जून
एलएलबी (५ वर्षे) सीईटी - १६ जून
बीबीए, बीसीए सीईटी - १७ जून