मलकापूरजवळ दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील नांदुरा नाका उड्डाणवर दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे (२९ जुलै) अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच ०८. ९४५८ ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० तिर्थयात्री होते. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३० प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना नाशिककडे जाणाऱ्या रॉयल ट्रॅव्हल्सने तिच्या समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना हिंगोलीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात २ महिला आणि ३ पुरुष यांच्यासह एकूण ७ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.