बीआरएस भाजपची बी टीम नव्हे...
#पुणे
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस हा पक्ष आमची बी टीम नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. १७) पुण्यात दिले.
बीआरएसच्या महाराष्ट्रातील प्रवेशावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी अशा गोष्टी पसरवत आहे. राजकारणात कोणीही नवं आलं की बी टीम. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. ती आमची बी टीम नाही. नवीन पक्षाची भीती पवार आणि काँग्रेसला वाटते. बीआरएसशी आम्हाला काहीही देणं-घेणं नाही.’’
मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली. २०१४ ते २०१९ च्या निवडणुकांमध्ये जो जाहीरनामा दिला गेला त्याप्रमाणे सरकारने काय काम केलं, ते राज्यातल्या ३ कोटी घरापर्यंत आम्ही संपर्क ते समर्थन आणि घर चलो अभियान या माध्यमातून पोहोचवणार आहोत. टिफिन बैठकीतून संवाद साधणार आहोत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
पहिल्या जाहिरातीला दुसऱ्या जाहिरातीने नष्ट केलं...
मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. एका परिवारातल्या दोन भावांमध्ये काही कारणाने मतभेद होत असतात. मात्र फेविकॉल का जोड पक्का आहे. शिवसेना-भाजपचा जोड फेविकॉलचा आहे. तो कधीही तुटणार नाही, असं बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले.
एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना आमच्या युतीवर परिणाम करू शकत नाही. २०२४ मध्येही भाजप आणि शिंदे गट शिवसेना एकत्र असेल, असा दावादेखील बावनकुळे यांनी केला. ‘‘थोडा गैरसमज किंवा समज त्यामुळे काही फरक पडणार नाही. अतिउत्साही कार्यकर्ते असतात. भावनेच्या भरात कोणी काही करतं-बोलतं. मी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या जाहिरातीला दुसऱ्या जाहिरातीने नष्ट केलं,’’ असा युक्तिवाददेखील बावनकुळे यांनी केला.
वृत्तसंस्था