दोन लाखांसाठी पुणे, मुंबईत बाॅम्बस्फोटाची धमकी
#मुंबई
उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने अवघ्या दोन लाख रुपयांसाठी पुणे आणि मुंबई या शहरात बाॅम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा विजेच्या चपळाईने तपास करीत आरोपीला उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून ताब्यात घेतले.
मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस सक्रिय झाले. त्यांनी फोन कोठून आला, याचा शोध सुरू केला होता. हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून आल्याचे तपासात समोर आले. अंबोली पोलिसांनी या संदर्भात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांनी दरवेश राजभर या आरोपीला जौनपूरमधून अटक केली आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने बॉम्बस्फोट थांबविण्यासाठी पोलिसांकडे २ लाखांची मागणीही केली. मागणी पूर्ण झाल्यावर आपण आपल्या माणसांसोबत विदेशात निघून जाऊ, असेही त्याने म्हटले होते. कॉलरने गुरुवारी सकाळी १० वाजता मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला. त्याने म्हटले की, तो २४ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट करणार आहे. पुणे शहरातही बॉम्बस्फोट होणार आहेत, तो स्वत: हा स्फोट घडवून आणणार आहे, त्यासाठी दोन कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु आपणास फक्त दोन लाख रुपये मिळाल्यास आपण आपल्या माणसांसोबत मलेशियाला निघून जाऊ, असा दावा कॉलरने केला होता.
वृत्तसंस्था