कल्याण-डोंबिवलीच्या जागेवरून भाजप-शिंदे गट वाद विकोपाला
#मुंबई
कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे येथून खासदार आहेत. भाजप-शिवसेनेच्या वादात शिवसेना खासदार शिंदे यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना वाद विकोपाला गेला आहे. भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपच्या इतर स्थानिक नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. दबावात गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत थेट श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला आव्हान दिल्यामुळे उद्विग्न झालेल्या श्रीकांत शिंदेंनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. राजकीय स्वार्थापोटी युतीत कुणीतरी मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप श्रीकांत शिंदेंनी केला.
केंद्रात मोदींचं सरकार यावं, हेच आपलं ध्येय असल्याचंही खासदार शिंदे यांनी म्हटलं आहे. देशातील तमाम जनतेचाही तसा निर्धार आहे, पण डोंबिवलीमधल्या काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारण सुरू असून शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा टाकला जात आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय युतीतले वरिष्ठ नेते घेतील. मला कोणत्याही पदाची लालसा नाही, ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आम्ही एकदिलाने प्रचार करून त्याला विजयी करू, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
केंद्रात भाजप-शिवसेना युती आणि मित्र पक्षांचं सरकार स्थापन व्हावं यासाठी आम्ही काम करत आहोत, पण याला कुणाचा विरोध असेल आणि युतीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तर पदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमका वाद?
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कल्याण मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजपची एक बैठक झाली. या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारने केंद्रात ९ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने अभिनंदनाचा ठराव मांडला, याला भाजप पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी पोलीस निरीक्षक शेखर बगाडे यांच्या बदलीची मागणी करत, बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसाठी काम न करण्याचं तसंच कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा प्रस्ताव मांडला. बैठकीत एकमताने हा ठराव पारित करण्यात आला. रवीद्र चव्हाण यांनीही आपण कार्यकर्त्यांच्या भावन जपणार असल्याचं सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे.
वृत्तसंस्था