‘मनसे’च्या पाठिंब्यामुळे मुंबईमध्ये भाजपाचा ‘सेल्फ गोल‘: आंबेडकर
अकोला : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भारतीय जनता पक्षाने ‘सेल्फ’ गोल केला, असल्याची बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. भाजपला राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS)दिलेल्या पाठिंब्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे प्रतिपादन आंबेडकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढी पाडव्याच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच भाजपचे विविध नेते गेल्या काही महिन्यांत त्यांच्याशी सत संपर्क ठेवून चर्चा करत होते. त्याचा परिणाम म्हणून राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या महानगरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ‘लुंगी हटाव, पुंगी बजाव’, या दक्षिण भारतीयांच्या विरोधातील आंदोलनानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन उभे केले. मनसेने धारावी येथे छट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारहाणही केली होती. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिल्यामुळे मुंबईत राहणारे बिहार, उत्तर व दक्षिणेतील नागरिक ज्यांना भाजप जवळची वाटत होती, त्यांना आता असुरक्षित वाटू लागले आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केलेले नाहीत. निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील आणि ते झाले की, मुंबईमधील गणित पूर्ण बदलते. त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करु, असेही त्यांनी सांगितले.