आगामी लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बदल करायला सुरुवात केली असून २०२४ साठीचा 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. राज्यातील सर्वच ४८ लोकसभा मतदारसंघातील यशाची जबाबदारी असणाऱ्या नेत्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 08:24 am
आगामी लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन

आगामी लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन

महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर

#मुंबई 

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बदल करायला सुरुवात केली असून २०२४ साठीचा 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. राज्यातील सर्वच ४८ लोकसभा मतदारसंघातील यशाची जबाबदारी असणाऱ्या नेत्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र हे सगळे करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला किती जागा येणार, याबाबत भाष्य करणे टाळले आहे. भाजपने राज्यातील ४८ जागा जिंकण्याची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांवर टाकल्यामुळे शिंदे गटाला मोजक्या जागांवर समाधान मानावे लागणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संघटनेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. संघटनात्मक बदलांतर्गत अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. या पार्श्वभूमीवर मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. यात खासदार विनय सहस्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांच्यावर वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

भाजपने मिशन-२०२४ साठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार याची चर्चा रंगली असतानाच पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांची जबाबदारी वाटण्यात आली आहे. पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी ३ जून रोजी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. या बैठकीमध्ये निवडणूक प्रमुखांकडे त्या-त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest