भाजपने वाढवली शिंदे गटाची धाकधूक

महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात वादाच्या फैरी झडत असतानाच राज्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातदेखील सर्व काही आलबेल नसल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. या दोन पक्षांमधील संवादाचा अभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 11 Jun 2023
  • 12:46 am
भाजपने वाढवली शिंदे गटाची धाकधूक

भाजपने वाढवली शिंदे गटाची धाकधूक

लोकसभेच्या तयारीसाठी सर्व ४८ मतदारसंघांत सभा घेण्याची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची घोषणा

#मुंबई

महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात वादाच्या फैरी झडत असतानाच राज्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातदेखील सर्व काही आलबेल नसल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. या दोन पक्षांमधील संवादाचा अभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. सर्व आगामी निवडणुका शिंदे गटासोबत एकत्रितपणे लढविण्याची घोषणा भाजकडून करण्यात आली असतानाच या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूक पुन्हा वाढली आहे.

भाजपसाठी २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक प्रचंड महत्त्वाची आहे. त्यासाठी या पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत प्रत्येकी एक याप्रमाणे ४८ सभा घेण्याचे उद्दिष्ट भाजपच्या वतीने ठेवण्यात आले आहे. त्यातील पहिली सभा नांदेड लोकसभा मतदारसंघात होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या सभेला संबोधित करतील. ‘‘निवडणुकीची तयारी म्हणून भारतीय जनता पक्षाने २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमले आहेत,’’ असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी म्हणून मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नऊ वर्षांचा लेखाजोखा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये एकूण ४८ लोकसभा मतदारसंघात ४८ सभा होणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सभा यशस्वी करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आणि खासदारांमधील धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरीदेखील भाजपच्या हालचालींकडे शिंदे गटातील सर्वांचे बारीक लक्ष राहणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

शिवसेनेसाठीदेखील ताकद लावू : बावनकुळे

अमित शहा यांची सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत प्रश्न विचारला असता, आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांसाठीदेखील ताकद लावणार आहोत, असे बावनकुळे यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत ४० पेक्षा जास्त जागा आणि विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणणे हे आमचे टार्गेट आहे. यासाठी पक्षाची सर्व यंत्रणा झाडून कामाला लागलेली आहे,’’ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest