भुजबळांचा राऊतांना सबुरीचा सल्ला
#नाशिक
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करणारे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना छगन भुजबळ यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीतील नेतेच एकमेकांवर टीका करत असतील तर लोकांचा वज्रमूठीवर विश्वास राहणार नाही, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता या वादात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. त्यांनी संजय राऊत यांना सल्ला दिला. भुजबळ म्हणाले, ‘‘आपण सर्व जण महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहोत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत एकत्र असताना एकमेकांवर शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे. अशानं वज्रमूठीवर लोकांचा विश्वास राहणार नाही.’’
यावेळी भुजबळ यांनी लोकसभेच्या जागा वाटपावरदेखील प्रतिक्रिया दिली. ‘‘लोकसभेच्या राज्यात ४८ जागा आहेत. जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. त्यावर चर्चा करू नये,’’ असे भुजबळ म्हणाले.
वादळी वाऱ्याचा तडाखा
जून महिना सुरू होताच माॅन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरे पडली. रस्त्यांवर झाडे कोसळली. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, नेवासे पाथर्डी तालुक्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पाथर्डी-बीड राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी येथे राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाका कोसळला.
वृत्तसंस्था