संग्रहित छायाचित्र
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीवर असलेल्या भंडारदरा धरणाचं नाव बदलण्यात आले असून 'आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे' असे या धरणाचे नाव असणार आहे. या संदर्भात शासनाने नुकताच आदेश जारी केला आहे. नुकतीचं अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नुकतेच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानंतर लगेचच नगर जिल्ह्यातीलच प्रसिद्ध अशा भंडारदरा धरणाचे नाव बदलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भंडारदरा धरण हे अकोले तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे धरण आहे. धरणाच्या जवळच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आहे. तसेच रंधा फॉल हा धबधबा देखील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. ब्रिटिश राजवटीत १९१० मध्ये भंडारदरा धरण बांधण्यास सुरवात झाली. १९२६ मध्ये धरणाचे बंधकाम पूर्ण झाले. १०डिसेंबर १९२६ रोजी या धरणाचे लोकार्पण तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेसस्ली विल्सन यांच्या हस्ते करण्यात आले. या भंडारदरा धरणाला तत्कालीन ब्रिटिश सरकारने ‘विल्सन डॅम’ तर त्या मागच्या जलाशयाला ‘ लेक आर्थर हिल’ असे नाव दिले होते. आर्थर हिल हे तेव्हाचे मुख्य अभियंता होते
दरम्यान, भंडारदरा धरणाचे नाव 'आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे' करावे अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी केली होती. 2021 पासून धरणाचे नाव बदलावे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी धरणावर आंदोलन देखील करण्यात आले होते.
कोण आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे
वीर राघोजी भांगरे या आदिवासी क्रांतिकारकाने इंग्रज राजवटीविरोधात उठाव केला होता. त्यांनी जुलमी सावकारशाही विरोधात बंड पुकारले. अकोले तालुक्यातील देवगाव येथे त्यांचा जन्म झाला. आपल्या वडलांकडून त्यांना संघर्षाचा वारसा मिळाला. अगदी तरुण वयात आदिवासी तरूणांना त्यांनी संघटित केले. इंग्रजांच्या विरोधात त्यांनी उठाव केला. वीर राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने चार हजार रूपये इनाम ठेवले होते. त्यांनी नगर, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांमधील जुलमी सावकरांविरोधात बंड पुकारले. त्यांच्याकडील गहाणखते जाळून टाकली. अखेर जानेवारी 1948 पंढरपूर येथे वीर राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी पंढरपूर येथे पकडले. त्यांच्या विरोधात एकतर्फी खटला चालवला आणि 2 मे 1948 रोजी त्यांना ठाणे येथील जेलमध्ये फाशी देण्यात आले. आजही ठाणे येथील जेलमध्ये राघोजी भांगरे यांचे स्मारक असून जेलसमोरील चौकाला राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात आले आहे.