कृत्रिम फुलांमुळे मावळातील फूलशेती धोक्यात
मावळातील गुलाब दरवर्षी मोठा भाव खातो. भारतातच नव्हे तर, परदेशातील सात ते आठ देशांत मावळातून गुलाब निर्यात होत असतो. मात्र यंदा थंडी कमी असल्याने उत्पादनवाढीसाठी खते, औषधांचा वापर करावा लागला. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये लग्न समारंभाचे मुहूर्त कमी होते, त्यामुळे स्थानिक बाजारात फुलांची विक्री कमी झाली. हल्ली सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम (आर्टिफिशल -प्लास्टिक) फुलांमुळे दिवसेंदिवस गुलाबाची मागणी घटू लागली आहे. यामुळे यंदा केवळ ४० टक्के गुलाब परदेशी जाऊ शकला.
जगभरातील तरुणाईला उत्कंठा लावणारा 'व्हॅलेंटाइन डे' एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला मावळातून २५ ते ३० लाख फुलांची निर्यात होणार आहे. गतवर्षी हे प्रमाण सुमारे ५० ते ५५ लाख होते. यंदा या निर्यातीत ४० टक्क्यांची घट झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात २५० ते ३०० हेक्टरवर गुलाब फुलाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गुलाब परदेशात पाठवला जातो. 'व्हॅलेंटाईन डेसह इतर उत्सवाचा आठवडा हा विक्रीचा मुख्य कालावधी असला तरी वर्षभर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. मावळातील फूल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करतो. एका फुलासाठी साधारण पाच ते सहा रुपये उत्पादन खर्च येतो, तर परदेशी बाजारपेठेत या काळात एका फुलाला १८ ते २० रुपये आणि स्थानिक बाजारपेठेत १४ ते १५ रुपयाला विकला जातो.
२६ जानेवारी ते १० फेब्रुवारी हा काळ जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो. या वर्षी मावळातील गुलाबाच्या निर्यातीला २६ जानेवारीला सुरुवात झाली. उत्पादनाचे प्रमाण, गुणवत्ता चांगली असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र या वर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे. फुलांच्या भावाची प्रतवारी लांबीनुसार ठरते. स्थानिक व जागतिक बाजारपेठेत ५० ते ६० सेंटिमीटरच्या फुलांना अधिक पसंती असते. यंदा मावळातील फुलांना मागणी घटली आहे. जागतिक बाजारपेठेत प्रतवारीनुसार एका फुलाला १३ ते १४ रुपये भाव आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेत भाव कमी-अधिक होत आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा एक ते दोन रुपयांनी भाव कमी झाल्याचे फूल उत्पादक सांगत आहेत.
या वर्षी मावळातील फुलांना प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत एका फुलाला १४ ते १५ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत १० ते १२ रुपये भाव मिळत आहे. व्हॅलेंटाइन डेला मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीच्या लाल रंगाच्या टॉप सिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फर्स्ट रेड, पिवळ्या रंगाच्या गोल्ड स्ट्राइक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉइजन, नारिंगी रंगाच्या ट्रॉपिकल ॲमेझॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलॉस या जातीच्या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे सर्वाधिक मागणी आहे.
... म्हणून झाली घसरण
भारताच्या तुलनेत केनिया व इथोओपिया या देशांमधून कमी दराने निर्यात होत असल्याने नेदरलँडच्या बाजारपेठेत भारतीय फुलांची मागणी घटली आहे. यामुळे मावळ तालुका व कर्नाटक-तामिळनाडूच्या सीमेवरील होसूरमधून उत्पादित होणाऱ्या फुलांना स्थानिक बाजारपेठेचा पर्याय शिल्लक राहिला आहे. परिणामी, स्थानिक बाजारातील फुलांचे भाव गडगडले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आठ ते दहा रुपयांनी दर घसरल्याची माहिती फूल उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांनी दिली.
मावळातील गुलाबाचा रंग उडाला
१ ते ९ फेब्रुवारीदरम्यान मावळ तालुक्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फुले पाठवली जातात. १० तारखेपासून स्थानिक बाजारपेठेत फुले पाठवली जातात. ही फुले साठवून ठेवण्यासाठी शीतगृहांची व्यवस्था नसल्याने दलालांचे फावते. ते शेतकऱ्यांकडून कमी भावाने फुले घेऊन त्याची साठवणूक करत मागणी वाढल्यानंतर ज्यादा दाराने त्याची विक्री करतात.
स्थानिक भाव गडगडले परदेशात पाठवण्यासाठी एअरलाईन स्पेस उपलब्ध झाली नाही. गुलाब निर्यात नोंदणी प्रक्रियेदरम्यान शासनाचे संकेतस्थळ हॅक झाले होते. परिणामी कार्गोमध्ये गुलाब टाकता आला नाही. तो वेळेवर पोचला नसल्याने स्थानिक बाजारपेठेत विकावा लागला. बाजारपेठेतील फुलांची आवक वाढल्याने भाव गडगडले होते.
देशांतर्गत बाजारपेठ
पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकाता, भोपाळ, इंदूर, सुरत, हैदराबाद व गोवा या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सर्वाधिक मागणी असते.
या देशात जातात मावळातील फुले
जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप, दुबई, लेबनन आदी.
डिसेंबरमधील लग्नसराई या वर्षी कमी झाल्याने स्थानिक बाजारात फुलांची विक्री कमी झाली. त्यातच लग्नसराई व इतर कार्यक्रमांमध्ये कृत्रिम फुलांचा वापर वाढू लागला, कृत्रिम फुलांच्या आयातीवर बंदी घालण्यात यावी.
- मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ, पवनानगर