संग्रहित छायाचित्र
सोलापूर प्रतिनिधी : दक्षिण मध्य मतदारसंघात सर्व पक्षांचा प्रचार रंगला आहे. देशमुख आणि काडादी यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. मात्र हलगीच्या सुरात कोण-कोणाचा प्रचार करत होते हे लक्षातही येत नव्हते. आपापल्या उमेदवारांचा जयघोष करत हे कार्यकर्ते आपापल्या वाटेने निघून गेले.
सोलापूर दक्षिण तालुक्यातील उमेदवारांच्या प्रचारामुळे जुळे सोलापुरात हा रविवार सुपर संडे ठरला. प्रचाराच्या मोठमोठ्या रॅलीज काढण्यात आल्या. या परिसरात मंगल कार्यालये अधिक असल्याने लग्नाचा बँडबाजा आणि प्रचारातील हलगीच्या आवाजाने जुळे सोलापूर दुमदुमून गेले होते. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे वातावरण निर्मितीमध्ये आघाडीवर आहेत. धर्मराज काडादी यांनी भव्य पदयात्रा काढली व गर्जना चौक, सैफुल, विजापूर रोडमार्गे आयटीआय भारतीय विद्यापीठमार्गे गोविंद श्री मंगल कार्यालयात यात्रेचा समारोप केला, तर सुभाष देशमुख यांनी सोलापूर परिसरातील नागरिकांच्या बैठकीवर जोर दिला होता. अमर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जुळे सोलापुरातील घरोघरी प्रचार केला. इतर अपक्ष उमेदवार वाजत-गाजत जुळे सोलापूर गावात रॅली काढत होते. या परिसरात मंगल कार्यालये अधिक आहेत. त्यातच रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने बॅंडबाजा आणि प्रचारातील फटाक्यांच्या आवाजाने वऱ्हाडी आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. काही वऱ्हाडी प्रचाराच्या ठिकाणी आले तर रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेले कार्यकर्ते मंगल कार्यालयाच्या परिसरात शिरले. अनेक ठिकाणी विविध भागातील उमेदवारांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.