आषाढी एकादशी अन् बकरी ईद एकाच दिवशी! पशुहत्या न करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय

हिंदू आणि मुस्लीम समाजात सामंजस्य आणि एकता कायम राहावी, यासाठी पारनेर (जि. नगर) तालुक्यातील निघोज येथील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 18 Jun 2023
  • 02:34 am
आषाढी एकादशी अन् बकरी ईद एकाच दिवशी! पशुहत्या न करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय

आषाढी एकादशी अन् बकरी ईद एकाच दिवशी! पशुहत्या न करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय

#अहमदनगर

हिंदू आणि मुस्लीम समाजात सामंजस्य आणि एकता कायम राहावी, यासाठी पारनेर (जि. नगर) तालुक्यातील निघोज येथील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शांतता कमिटीचे डॉ. सय्यद यांनी यावेळी प्रवचनाच्या माध्यमातून मुस्लीम-हिंदू समाजातील एकतेचा मंत्र देत मार्गदर्शन केले. त्यानंतर बकरी ईदच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय या समाजाने घेतला. या निर्णयाचे सर्व समाजबांधवांनी स्वागत केले आहे.

निघोज येथील मशिदीमध्ये शांतता कमिटी, मुस्लीम समाजबांधव, निघोज येथील आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीएसआय उगले होते. ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभाव यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. कोणताही सण असो तो आपण सर्वजण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतो. कोण कोणत्या जातीचा आहे, हे विसरून जातो. आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे हिंदू-मुस्लीम समाजाचे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. एकादशीच्या दिवशी उपवास करीत ‘सर्वांना सुखी ठेव’ ही प्रार्थना केली जाते. बकरी ईदला आपण पैगंबराजवळ हीच मागणी करतो. मग पशुहत्या करीत आपण काय साध्य करतो? यापेक्षा एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने पशुहत्या टाळणे गरजेचे आहे,’’ असे मत  यावेळी डॉ. सय्यद यांनी व्यक्त केले.

आजच्या युवकांना नीतिमत्तेचे धडे देण्याची गरज आहे. यासाठी विद्यालय, महाविद्यालयात संत तुकाराम महाराज, पैगंबर या विषयी शिक्षण देण्याची गरज असल्याचेही डाॅ. सय्यद यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्वधर्मसमभाव जपण्याचे काम केले आहे. त्यांनी जनतेवर अन्याय करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांना संपवण्याचे काम केले. महाराजांच्या सैन्यदलात सर्व समाजाच्या लोकांचा सहभाग होता, असेदेखील डाॅ. सय्यद यांनी निदर्शनास आणून दिले.

आज मात्र आपण जातीधर्माच्या अतिआहारी जाऊन वागत आहोत. यामुळे जातीय-धार्मिक तेढ निर्माण होत आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांचे प्रबोधन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सर्वधर्मसमभाव हाच संदेश महत्त्वपूर्ण असून यामुळे सर्व समाजाबरोबर देशाचा विकास होणार असल्याची भावना डाॅ. सय्यद यांनी व्यक्त केली.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest