बाजार समिती निवडणुकीत दुसऱ्या पवारांनाही धक्का
#अहमदनगर
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बाजार समिती निवडणुकीत भाजपने धक्का दिला होता. आता आमदार रोहित पवार यांना भाजपने नगर जिल्ह्यात धक्का दिला असून कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदी निवडून आलेले दोघेही भाजपच्या राम शिंदे गटाचे आहेत.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पुण्यात अजित पवार यांना भाजपने धक्का दिला. अजित पवार यांचे २४ वर्षांचे वर्चस्व मोडित काढून हवेली बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनलने बाजी मारली होती. आता नगर जिल्ह्यातही राष्ट्रवादीला भाजपने धक्का दिला आहे. या ठिकाणी रोहित पवार यांना धक्का देत राम शिंदे यांचे पॅनल निवडून आले आहे. संचालकपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटाच्या प्रत्येकी ९ जागा निवडून आल्या होत्या.
कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने झेंडा रोवला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाने या निवडणुकीत बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. सभापतिपदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापतिपदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झाला. भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
वृत्तसंस्था