अनिल देशमुख : परमबीर सिंह यांना कामगिरीचे बक्षीस मिळाले
#मुंबई
महाविकास आघाडीत गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर लाचखोरीचा आरोप करून देशभर खळबळ माजवणारे मुंबईचे निलंबित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यावर अनिल देशमुख यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, मला अडकविण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला. आता त्याबद्दल बक्षीस म्हणून परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे.
बुधवारी (१७ मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक झाली. त्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, याबाबत मी कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तरपणे बोलणार आहे. या बैठकीनंतर मी पुन्हा सविस्तर बोलणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील यांनी अनिल देशमुख यांना फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर कोणत्या अदृश्य शक्तीने केला होता, हे आता समोर आले आहे, असा आरोप केला.
प्रवीण कुंटे म्हणाले की, “देशमुख यांच्यावर सिंह यांनी आरोप केले होते. त्यामुळे देशमुखांना बदनामीस सामोरे जावे लागले. त्याचबरोबरीने तुरुंगात जावे लागले. परमबीर सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचार, खंडणीचे १० गुन्हे दाखल आहेत. ते अनेक दिवस फरार होते. सत्तेवरील राज्य सरकार परमबीर सिंग यांना संरक्षण देत आहे. उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवणे, तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तरीसुद्धा त्यांना संरक्षण देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे.
ते पुढे म्हणाले की, भाजपा व त्यांच्या सरकारच्या विरोधात जो बोलतो, त्याचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय, आयकर विभागाची नोटीस पाठवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील राज्यभर दौरे करून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप कुंटे पाटील यांनी केला.