अदृश्य हात रचतोय महाराष्ट्रात षडयंत्र

कोणाचा तरी अदृश्य हात महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडवण्याच्या दृष्टीने षड‌्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. १२) केला. त्यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 13 Jun 2023
  • 11:05 am
अदृश्य हात रचतोय महाराष्ट्रात षडयंत्र

अदृश्य हात रचतोय महाराष्ट्रात षडयंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

#बारामती

कोणाचा तरी अदृश्य हात महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडवण्याच्या दृष्टीने षड‌्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. १२) केला. त्यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बारामतीत दाखल झालेल्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘राज्यात जिल्हा परिषदेपासून ते महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. वारंवार सांगूनही राज्य सरकार निवडणुका घेत नाहीयेत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. या निवडणुका का होत नाहीत,’ असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘कोणता तरी अदृश्य हात महाराष्ट्रात काहीतरी घडवण्यासाठी षड‌्यंत्र रचतोय. हे तर दिसतच आहे.’’

शेतकऱ्यांच्या फसवणुकीवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण राबवत आहे. केंद्र सरकारला पहिला यूटर्न घ्यायला शेतकऱ्यांनीच भाग पाडलं. हल्ली दुधासह शेतमालाचे भाव पडले आहेत. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे,’’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

औरंगजेब मुद्द्यावरून राज्यातील वातावरण धुमसत आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यालाच जबाबदार ठरवलं. ‘‘गृहमंत्रालय काय करतंय? अशा गोष्टींवर लक्ष ठेवणं हे गृह मंत्रालयाचं काम आहे. दोन महिन्यांपूर्वी सतेज पाटील यांनी अशा घटना होतील, अशी शंका व्यक्त केली होती. सतेज पाटलांना आधी समजत असेल तर पोलीस यंत्रणा काय करतेय. महाराष्ट्रातल्या गृह विभागाचे सातत्याने अपयश पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात सातत्याने अशा घटना होतातच कशा,’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार यांच्या कथित नाराजीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसवर टीका करणाऱ्यांचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. ‘‘भाजप आंब्याच्या झाडावरच दगड मारणार. त्यामुळे अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यापुढे भाजपकडे अजेंडाच नाही. रोज भाजप आमच्यावरच टीका करतंय. त्यातून तुम्हाला कळेल कोणतं नाणं मार्केटमध्ये चालतं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

पोलीस नेमके कोणाच्या बाजूने?

नवी दिल्लीत ऑलिम्पिकसह प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पदकविजेत्या महिला मल्लांनी लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन केले. त्या महिला मल्लांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आळंदीत वारकऱ्यांबाबतही रविवारी हेच घडले. पोलिसांकडून झालेल्या या हल्ल्यांबाबत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘वारकऱ्यांवर लाठीचार्जची आळंदीतील घटना धक्कादायक आहे. त्याचा मी निषेध करते. सातत्याने या देशातील पोलीस यंत्रणा जिथे आवश्यकता असते तिथे उपस्थित नसते. मात्र देशासाठी पदक मिळवणाऱ्या आंदोलक मुलींवर लाठीचार्ज करायला पुढे असतात. जे वारकरी ३५० वर्षे विठ्ठलाच्या दर्शनासाठी शांततेच्या मार्गाने जातात, त्यांच्यावर पोलिसांकडून हल्ला होणं हे दुर्दैवी आहे. पोलीस यंत्रणा नक्की कोणाच्या बाजूने आहे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्रातही पोलिसांची चुकीची वागणूक दिसत आहे.’’

दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारकरी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकरी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेड्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याने पालखी सोहळ्याला गालबोट लागले. ‘‘जे आजवर कधीही घडले नाही ते या वर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या पूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणुकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माउलींच्या दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी,’’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest