'माझी माती, माझा देश' उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ
मुंबई : 'मेरी माटी, मेरा देश' अर्थात 'माझी माती, माझा देश' अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध (maharashtra News) गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा (Amrit Kalash Yatra) विशेष रेल्वे (Special Train) २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक कुशल सिंह, विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमाची सुरूवात ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती.