भारतातील सर्वच मुस्लिम हिंदू होते, पण त्यापूर्वी बौद्ध होते...
#अहमदनगर
‘‘भारतातील सर्वच मुस्लिम बांधव हे आधी हिंदू होते, पण त्यापूर्वी ते बौद्ध होते,’’ असा विवादास्पद दावा केंद्रीय मंत्री तथा रिपाइं (आ.) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (दि. २८) केला. यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
रामदास आठवले बुधवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तिथे पत्रकारांसी संवाद साधताना त्यांनी ही दावा केला. ते म्हणाले, ‘‘भारतातील सर्वच मुसलमान हे पूर्वी हिंदू होते. पण हिंदू होण्यापूर्वी ते सर्वजण बौद्ध होते. बौद्ध होण्यापूर्वी सर्व वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुस्लिम नाहीत. त्यामुळे हिंदू समाजाने त्यांना समजून घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर मुस्लिमांनीही हिंदूंच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे.’’
औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावरही आठवले यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘औरंगजेबाचा उदोउदो करण्याची भूमिका योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणे आमच्या दलित समाजाला आवडले नाही. मुस्लिम तरुणांनीही औरंगजेबाचा उदोउदो करून हिंदूंमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.’’ आमचा मुस्लिमांना विरोध नाही. पण कुणीही हेतुपुरस्सर खोड काढण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारादेखील आठवले यांनी दिला.
वृत्तसंस्था