अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण या मुद्द्यावरून चांगलंच तापल्याचं दिसलं. अजित पवार यांनी या ठिकाणची पाहणी केली. तसेच राज्य सरकार नवीन पुतळा बसवण्यासाठी गेली दोन-तीन दिवस बैठका घेत असल्याची माहिती दिली.
अजित पवार यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसा असा एक पुतळा या ठिकाणी उभारण्यात येईल. या ठिकाणच्या शेजारील जमीन देखील घेण्याचा विचार सुरू आहे. तसेच ती व्यक्ती देखील ही जमीन देण्यास तयार आहे. बारकाईने लक्ष देऊन पुन्हा या ठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे. दोन दिवसांपासून सरकार यासाठी बैठका घेत आहे.
त्यानंतर या भेटीबाबत एक ट्विट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. आपल्या ट्विट मध्ये त्यांनी लिहिलं की, "मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. आज घटनास्थळी भेट दिली, आढावा घेतला. किल्ल्याची देखील पाहणी केली. शिवराय आपला स्वाभिमान आहेत, आपली अस्मिता आहेत. याठिकाणी लवकरच महाराजांचा मजबूत आणि भक्कम असा पुतळा पुन्हा एकदा मानानं उभा राहील, असा शब्द देतो."