संग्रहित छायाचित्र
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार गटातील आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणण्याची तयारी सुरू केली आहे. कधीकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेल्या नजीब मुल्ला यांना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
नजीब मुल्ला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. नजीब मुल्ला अंगरिका मुहूर्तावर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर रणशिंग फुंकणार आहेत. कळवा मुंब्रा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आव्हाड मोठ्या मताधिक्याने तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे अजित पवार गट कळवा – मुंब्रा विधानसभा क्षेत्रात विविध कामांबाबत ताशेरे ओढणार आहे. दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांचा देखील हा लोकसभा मतदारसंघ आहे. यामुळे महायुतीकडून नजीब मुल्ला यांना विधानसभा निवडणुकीत पाठबळ मिळणार आहे. एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे नजीब मुल्ला राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक झाले आहेत. त्यांनी ठाण्यानंतर कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.
मला कधीही मतांचे राजकारण करता आले नाही. विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत, असा टोला नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी लगावला. नागरिकांच्या समस्या त्या संदर्भातील आमची पोचपावती कामाची असणार आहे. मुंब्राच्या विकासासाठी आम्ही देखील सोबत होतो. मात्र आमच्या लक्षात आले आहे. त्यांचे बोलणे जास्त काम कमी, अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी महायुतीकडून जो पक्ष उमेदवार देईल त्यांना निवडून आणणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी म्हटले. विधानसभेत मी किंवा आनंद परांजपे उमेदवार असणार आहे, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले आहे. आता त्यांचा पापाचा घडा भरत आला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातून अनेक लोक पार्टी सोडून गेले आहेत. त्यांची आता सर्व पोलखोल करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.