संग्रहित छायाचित्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वीच १७ ऑगस्टला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
एका भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, १९ तारखेला रक्षाबंधन आहे. त्यापूर्वीच १७ ऑगस्टला जुलै आणि ऑगस्टचे पैसे नियमात बसणाऱ्या महिलांना मिळतील. असा आमचा प्रयत्न सुरू आहे. हा महिलांचा अधिकार असून महिलांना तो मिळायलाच हवा असं अजित पवार म्हणाले.
महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी जनतेने आम्हाला पाठबळ द्यावं. आम्हाला सहकार्य करावं. सरकार आल्यावर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' पूर्ण पुढील पाच वर्षे चालू राहील हे वादा करतो, असं अजित पवार म्हणाले
तसंच एका ट्विटच्या माध्यमातून अजित पवार यांनी 'लाडक्या बहिणींना दादांकडून ‘रक्षाबंधनाची ओवाळणी’ म्हणून १७ तारखेला ३ हजार रुपये मिळणार!' असल्याचं सांगितलं आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी लागणाऱ्या ३५००० कोटी रुपयांची संपूर्ण तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते