संग्रहित छायाचित्र
सूर्याच्या पृष्ठभागावर २३ मार्च २०२४ रोजी एक्स १.१ ‘सोलर फ्लेअर्स’चा म्हणजे सौर धुमाऱ्याचा शक्तिशाली उद्रेक झाला. पृथ्वीवरील अचानक तापमानवाढीमागे सौर धुमारे आणि पृथ्वीच्या चुंबकीय कवचकुंडलाचा संबंध असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे व्यक्त करतात. (heat wave)
अचानक तापमान वाढण्यामागे सौर धुमारे म्हणजे सोलर फ्लेअर्स आणि मॅग्नेटोस्फियर (पृथ्वीची चुंबकीय कवचकुंडले) यांचा संबंध आहे, असे शास्त्रीय विश्लेषण केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम), पुणे चे माजी हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. याच्या परिणामांमुळे वृक्षवल्लीने आच्छादित पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील तापमानात अचानक वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तसेच सोलापूरमध्ये ४३.१ अंश सेल्सिअस, तर सांगली, कोल्हापूर, नागपूर, वाशीम आदी ठिकाणी ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले आहे.
जोहरे यांनी सूर्यमालेत घडणाऱ्या विविध घटना, अंतराळ आणि पृथ्वीच्या वातावरणावर होणारे परिणाम आदी घटना अचानक तापमान वाढीस कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. सौर धुमारे (सोलर फ्लेअर्स) म्हणजे काय? यावर ते म्हणाले, ‘‘ सौर धुमारे म्हणजे सोलर फ्लेअर्स हे सूर्याच्या पृष्ठभागावरील तीव्र ऊर्जा आणि किरणोत्सर्गाचा अचानक उद्रेक किंवा फवारे तयार होणे म्हणजे सौर फ्लेअर्स म्हणता येईल. २३ मार्च २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.०१ वाजता एक्स१. १ सोलर फ्लेअर्सचा शक्तिशाली उद्रेक झाला. सोलर फ्लेअर्सच्या स्फोटांमुळे लाखो हायड्रोजन बॉम्ब एकाच वेळी स्फोट होण्याइतकी ऊर्जा बाहेर पडते. सोलर फ्लेअर्स हे अनेकदा सौर डाग म्हणजे सनस्पॉट्सशी संबंधित असतात, जे तीव्र चुंबकीय वादळांमुळे सूर्याच्या पृष्ठभागावरील गडद भाग बनवितात. सौर धुमारे हे क्ष-किरण आणि अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रे, तसेच विविध प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात. त्यांच्या शक्तीच्या आधारावर सी, एम आणि एक्स प्रकार असे सौर धुमाऱ्यांचे वर्गीकरण केले जाते.
सौर धुमाऱ्यांचे म्हणजे सोलर फ्लेअर्सचे वर्गीकरण हे त्यांच्या ऊर्जा शक्ती आणि तीव्रतेच्या आधारावर केले जाते, विशेषत: एक्स-रे सोलर फ्लेअर म्हणून ओळखले जाणारी मोजपट्टी यासाठी वापरतात. वर्गीकरण प्रणाली एक ते आठ अँगस्ट्रॉम ऊर्जा श्रेणीमध्ये मोजलेल्या क्ष-किरणांच्या उच्चांक फ्लेक्सवर आधारित आहे. एक्स प्रकारचे सौर धुमारे हे एम-प्रकारच्या सौर धुमाऱ्यांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. सी-प्रकारचे सौर धुमारे हे एम प्रकारच्या सौर धुमाऱ्यांपेक्षा कमकुवत व कमी शक्तिशाली असतात.
एक्स सौर धुमारे हे सर्वात तीव्र व शक्तिशाली ऊर्जावान सौर धुमारे असतात. रेडिओ ब्लॅकआउट्स, पृथ्वीच्या वरच्या वातावरणात दीर्घकाळ टिकणारी किरणोत्सर्ग वादळ निर्माण करण्यास सक्षम आहेत. कक्षेतील कृत्रिम उपग्रह आणि इतर अवकाशयानांचे देखील ते नुकसान करू शकतात. या व्यतिरिक्त, ते पृथ्वीच्या संरक्षणात्मक वातावरणाच्या बाहेर अंतराळवीरांना धोका निर्माण करू शकतात. तसेच वातावरणाच्या खालच्या थरात देखील ढवळण व भोवरे निर्माण करतात.
एम सौर धुमारे हे मध्यम तीव्रतेचे सौर धुमारे आहेत. ते ध्रुवांवर थोडक्यात रेडिओ ब्लॅकआउट आणू शकतात. तसेच किरणोत्सर्गाचे वादळ अंतराळातील अंतराळवीरांना धोक्यात आणू शकते, विशेषत: स्पेसवॉकवर किंवा अंतराळयानाच्या संरक्षणात्मक कवचाच्या बाहेर ते खूप प्रभाव दाखवितात.
सौर धुमारे व पृथ्वीच्या चुंबकीय कवच कुंडलांचा कसा संबंध आहे या संदर्भात जोहरे म्हणाले, ‘‘जेव्हा सौर धुमारे फुटतात तेव्हा ते सौर वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्युतभारीत म्हणजे चार्ज झालेल्या कणांचा प्रवाह भडीमार करीत सोडतात. पृथ्वीच्या सभोवतालचा प्रदेश हा चुंबकीय क्षेत्राद्वारे नियंत्रित केला जातो. हे विदयुतभारीत कण पृथ्वीच्या दिशेने झेपावताना, ते आपल्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राशी अभिक्रिया करीत संबंध साधतात. सौर वादळे आणि मॅग्नेटोस्फियर यांच्यातील परस्परसंबंधामुळे भूचुंबकीय वादळांचा त्रास होऊ शकतो. या वादळांमुळे पॉवर ग्रिड, उपग्रह संप्रेषण आणि नेव्हिगेशन सिस्टममध्ये यात अडथळे येऊ शकतात. पृथ्वीच्या ध्रुवाजवळ चमकदार व रंगीत ऑरा देखील निर्माण होऊ शकतात. ’’
सूर्यावरील स्फोटक सौर धुमाऱ्यांमुळे पृथ्वीवर अचानक तापमानात वाढ कशी होते या संदर्भात माहिती देताना जोहरे म्हणाले, सूर्यावरील स्फोटक सौर धुमाऱ्यांमुळे, सूर्याच्या वातावरणात साठवलेली चुंबकीय ऊर्जा अचानक चुंबकीय रिॲॅक्टिव्हेट नावाच्या प्रक्रियेत सोडली जाते. धुमाऱ्यांच्या ऊर्जाप्रकाशामुळे सूर्याचे वातावरण वेगाने गरम होते. जसजसे सूर्यापासून दूर जावे तसे तापमान कमी होत नाही तर ते वाढत जाते ही क्रिया अद्भुत आहे. विशेष म्हणजे प्रभावित प्रदेशातील तापमान काही सेकंदात लाखो अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. तीव्र उष्णतेमुळे सूर्याच्या वातावरणातील अणू अत्यंत ऊर्जावान बनतात, ज्यामुळे दृश्यमान प्रकाश, क्ष-किरण आणि गॅमा किरणांसह इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये विकिरण उत्सर्जित होते. सौर धुमाऱ्यांच्या स्फोटांचा पृथ्वीच्या तापमानावर अनेकदा अत्यंत खोलवर परिणाम होतो. त्यांचा परिणाम भौगोलिक परिस्थिती व सूर्य यामुळे सामान्यतः स्थानिक आणि जागतिक तापमानावर अचानक होतो. हे परिणाम इतर घटकांच्या तुलनेने अल्पकालीन असतात. यामुळे 'टेंपरेचर इडीज' म्हणजे तापमानाचे भोवरे निर्माण करीत थंड प्रदेशातदेखील अचानक तापमान वाढ काही काळासाठी घडवून आणतात. सूर्यापासून होणारे सौर धुमारे पृथ्वीवरील तापमान अप्रत्यक्षपणे चार यंत्रणांद्वारे वाढवू शकतात.
राज्यासह देशाच्या काही भागात यंदा तापमान ४८ अंश सेल्सिअसवरून ५४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी करणे आवशयक आहे. तापमान वाढीने, सनस्ट्रोकमुळे (उष्माघात) होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता असून त्यावर उपाय करण्यासाठी अलर्ट, जनजागृती, सावधगिरी आणि जलद प्रतिसाद वैद्यकीय पथके बनविणे आवश्यक आहे. अचानक तापमान वाढण्यामागे सौर धुमारे म्हणजे सोलर फ्लेअर्स आणि मॅग्नेटोस्फियर (पृथ्वीची चुंबकीय कवचकुंडले) यांचा संबंध आहे. यामुळे वृक्षवल्लीने आच्छादित पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील तापमानात अचानक वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
- प्रा. किरणकुमार जोहरे, माजी हवामान शास्त्रज्ञ,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम), पुणे