मुंबईत परीक्षेला निघालेल्या तरुणीवर लोकलमध्ये बलात्कार
#मुंबई
राज्याची राजधानी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गुरुवारी सकाळी एका धावत्या रेल्वेमध्ये वीस वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
गिरगावला वास्तव्य असलेली ही तरुणी परीक्षा देण्यासाठी बेलापूरच्या दिशेने जात होती. बुधवारी, सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती. बलात्कारानंतर पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. मस्जिद स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपीची ओळख पटली. घटना घडल्यानंतर आठ तासांनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याच्यावर बलात्काराच्या आरोपासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबईत धावत्या लोकलमध्ये सकाळी सकाळी बलात्कार झाल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात की, संतापजनक! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. राज्यातील गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.