पंतप्रधानपदावरील व्यक्तीने एवढे खोटे बोलू नये
#मुंबई
नरेंद्र मोदी यांनी स्वतःच त्यांची शरद पवारांबाबतची आधीची वक्तव्ये आठवून पाहावी. नरेंद्र मोदी म्हणाले होते की, शरद पवार हे या देशातले उत्तम कृषिमंत्री होते. देशात यूपीएचे सरकार होते, तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा केंद्र सरकारने मोदींबाबत वेगळी भूमिका घेतली होती. केंद्राने मोदींबरोबर असहकार्याची भूमिका घेतली होती तेव्हा कृषिमंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या कृषी आणि सहकार विभागात आवर्जून मदत करत होते. शरद पवारांनी मोदींची राजकारणापलीकडे जाऊन मदत केली आहे. ही गोष्ट मोदी यांनी स्वतः वारंवार सांगितली आहे. मोदींना एखाद्या गावात जाऊन निवडणुकीआधी खोटे बोलायचे असेल तर ते बोलू शकतात. परंतु, मोदींनी यापूर्वी सांगितले होते की, ते शरद पवारांचा हात धरून राजकारणात आले आहेत. शरद पवार हे त्यांचे राजकीय गुरू आहेत. तेच मोदी आता पवारांबद्दल वाट्टेल ते बोलत असल्याचा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
२०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होते आणि महाराष्ट्रातील नेते कृषिमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले जात होते, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली. यवतमाळ येथे बुधवारी (२८ फेब्रुवारी) आयोजित महिला मेळाव्यात मोदी बोलत होते. मोदी यांच्या शरद पवारांवरील टीकेला आता पवारांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे खोटे बोलत आहेत. पंतप्रधानपदासारख्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने खोटे बोलू नये. खासदार राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, महाराष्ट्रात आणि या देशातला सर्वात मोठा घोटाळा कुठला असेल तर तो आदर्श घोटाळा आहे. त्याच घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली आहे. मोदी यांनी असंही सांगितलं होतं की, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला आहे. इतका मोठा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु, त्याच सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवारांना त्यांनी आपल्या युतीत घेऊन उपमुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर आणि त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवावा अशी मानसिकता जनतेत राहिलेली नाही.
नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये काय म्हणाले होते?
मोदी म्हणाले, जेव्हा दिल्लीत यूपीएचे सरकार होते, तेव्हा देशाची काय अवस्था होती? तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषिमंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. केंद्र सरकारने एक रुपया पाठवला तर गावात फक्त १५ पैसे पोहोचत होते. परंतु, आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये जमा झाले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. आता काँग्रेस शासन असते, तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी मध्येच काही लोकांनी खाऊन टाकले असते.