‘जय श्री राम’ घोषणेसाठी कणकवलीत मुस्लिम तरुणाला जमावाची मारहाण

जय श्री राम’ची घोषणा दिली नाही म्हणून एका मुस्लीम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 Muslimyouthwasbeatenshouting'JaiShriRam'

‘जय श्री राम’ घोषणेसाठी कणकवलीत मुस्लिम तरुणाला जमावाची मारहाण

#कणकवली 

जय श्री राम’ची घोषणा दिली नाही म्हणून एका मुस्लीम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जानेवारीत हा तरूण कुटुंबासह कणकवलीहून मुंबईस रेल्वेने जात होता. यावेळी काही तरुण त्याच डब्यात ‘जय श्री राम’ अशी घोषणाबाजी करत होता. त्यांनी मुस्लीम तरुणालाही घोषणाबाजी करण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यावर  त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर या तरूणाने पनवेल पोलीस स्थानकात तक्रार केली. ही तक्रार कणकवलीला वर्ग केल्यानंतर त्याला गावी मारहाण झाली.

नेमका प्रकार काय ? सोशल मीडियावर २६ सेकंदाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ २४ जानेवारीचा असून त्यात एक टोळकं मुस्लीम तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. जय श्री राम बोल, असे काही लोक बोलतानाही दिसत आहेत. मागे एक महिला ओरडत असून त्याला मारू नका, असे म्हणत आहे. एका लहान मुलीचा रडण्याचा आवाजही येत आहे. ही महिला मुस्लिम तरूणाची पत्नी असून रडणारी मुलगी त्याचीच असल्याचे सांगितले जाते.

मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आसिफ शेख असे आहे. त्याने तक्रारीत म्हटले की, तो कुटुंबासह १९ जानेवारी रोजी कणकवलीहून मुंबईकडे रेल्वेने जात होता. यावळी डब्यात ३० ते ४० विद्यार्थ्यांचा जमाव होता. ते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होते. माझ्या बायकोने बुरखा घातला होता. विद्यार्थ्यांचा गट आमच्याकडे येऊन ‘जय श्री राम’ म्हणा असे सांगत होता. आम्हाला हे बोलण्याची बळजबरी करू नका, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलीच्या अंगावर गरम चहाचा कप फेकला. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली , अशी माहिती आसिफ शेख याने दिली. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मी तक्रार केल्याशिवाय मागे हटणार नाही म्हणाल्यानंतर त्यांनी तक्रार घेतली. मात्र यावेळी त्यांनी माझ्यावरही तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांच्या त्या गटातील एका महिनेले माझ्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप ठेवून तक्रार दाखल केली.

गावात जाऊन मारहाण

तीन दिवसानंतर मला पोलिसांनी फोन करून सांगितले की, माझी तक्रार कणकवली पोलीस स्थानकात वर्ग केली आहे. त्यामुळे मी कुटुंबासह २४ जानेवारी रोजी कणकवली पोलीस ठाण्यात गेलो. त्यावेळी तिथे भाजपाचा नेते आणि मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. भाजपाच्या नेत्याने मला तक्रार मागे घेण्यास सांगितले. नाहीतर माझ्या कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली. कणकवली पोलिसांनी सुरक्षा पुरवत घरापर्यंत पोहोचवल्याचे शेखने सांगितले. घरी पोहोचल्यानंतर तिथेही १५ ते २० जण आले. त्यांनी पुन्हा एकदा मला धमकी देत ‘जय श्री राम’ बोलण्यास सांगितले आणि मला मारहाणीस सुरूवात केली. यावेळी पोलीस उपस्थित होते. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना रोखले नाही. माझी पत्नी मला वाचविण्यासाठी मध्ये पडल्यानंतर तिलाही जमावाने धक्काबुक्की केली. यानंतर शेखने पुन्हा एकदा पोलिसांत तक्रार दाखल केली असून ११ जणांची नावे घेतले आहे. त्यातील २० हून अधिक लोकांना तो ओळखत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest