१२ वीचा निकाल जाहीर, राज्यातील ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातून ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात एकूण १२ लाख ९२ हजार ४६८ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.०१ टक्के निकाल लागला आहे.
महाराष्ट्रातून कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.०१ टक्के निकाल लागला असून मुंबई विभागातून सर्वात कमी ८८.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी २ टक्क्यांनी मुंबई विभागाचा निकाल घटला आहे. महाराष्ट्रातून एकूण विद्यार्थी १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी पैकी १२ लाख ९२ हजार ४६८ उत्तीर्ण झाले आहेत.
यात पुणे विभागातून ९३.३४ टक्के, नागपूरमधून ९०.३५ टक्के, औरंगाबादमधून ९१.८५ टक्के, कोल्हापूर ९३.२८टक्के, अमरावती ९२.७५ टक्के, नाशिक ९१.६६ टक्के आणि लातूर विभागातून ९०.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. सर्व विभागीय मंडळातील नियमित मुलींचा निकाल ९३.७३ टक्के तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के आहे. जे मुलींची निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा ९६.०९ टक्के, कला शाखेचा ८४.०५ टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.४२ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा ८९.२५ टक्के आणि आय टी आय शाखेचा ९०.८४ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी २ नंतर खालील वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल.
mahresult.nic.in
hsc.mahresults.nic.in
hscresult.mkcl.org
यासोबतच विद्यार्थ्यांना एसएमएसव्दारेही निकाल पाहता येणार आहे. एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.