मंत्रिमंडळ विस्तारात १०-१० चा फार्म्युला
#मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजी केले. त्यानंतर शहा यांच्या संमतीने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोन्ही पक्षांमधून प्रत्येकी १० आमदारांना मंत्रिपद देण्याचा फाॅर्म्युला तयार केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेला भगदाड पाडून बंड केले आणि भाजपच्या साथीने सरकारदेखील स्थापन केले. तेव्हापासूनच सरकार समर्थक आमदारांपासून विरोधी पक्षाचे नेतेदेखील मंत्रिमंडळ विस्ताराची वाट बघत आहेत. दीर्घकाळ मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने अपक्षांसह शिंदे गटातील इच्छुकांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. ९ महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारास यावेळी शहा यांनी परवानगी दिल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी १० आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे कळते.
शिवसेनेच्या वर्धापनदिनापर्यंत शपथविधी होईल. त्यात दोन्ही गटातील प्रत्येकी एक किंवा दोन महिलांनाही स्थान दिले जाऊ शकते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर १९ जूनला येणारा पक्षाचा हा पहिलाच वर्धापनदिन आहे. तो दणक्यात साजरा करण्याचे शिंदेंचे नियोजन आहे. तत्पूर्वी पक्षाचे आणखी १० मंत्री वाढावेत, असे त्यांचे प्रयत्न आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १२ खासदार आहेत. त्यापैकी दोन नेत्यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते. यात बुलडाण्याचे प्रतापराव जाधव, मुंबईतील गजानन कीर्तिकर यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांपाठोपाठ दक्षिण मध्य मुंबईचे खासदार मुख्यमंत्र्यांचे निकटस्थ राहुल शेवाळे यांच्याही नावाची चर्चा आहे.
शिंदे गटाला फुटीचा धोका
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी म्हणजेच १९ जूनपूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर धरला. अमित शहांना शिंदे यांचे म्हणणे पटले असल्याने १९ जूनपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी शिंदे गटातील एकूण आमदारांपैकी पूर्वी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आणि यावेळी इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या पाहता मंत्रिमंडळ विस्तारानंतरही या पक्षात फूट पडण्याचा धोका संभवतो.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या वेळी तरी आपल्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा असणारे अनेक आमदार आहेत. त्यामुळे या वेळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या घडामोंडीकडे शिंदे-फडणवीस यांना बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.
संजय शिरसाठ यांचे काय होणार?
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिंदे यांच्या बंडाच्या काळात प्रमुख भूमिका निभवली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यावेळी शिरसाट यांना डावलण्यात आले. सध्या ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
असे असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या तीन मंत्री आहेत. त्यामुळे त्यात आणखी भर टाकणे नव्या वादाला जन्म देणारे ठरू शकते. एकाच जिल्ह्याला इतकी मंत्रिपदे दिल्यास इतर जिल्हे नाराजीचा सूर लावू शकतात. त्यामुळे एक तर आधीच्या मंत्र्याला डच्चू मिळून संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. किंवा त्यांना या वेळीदेखील मंत्रिपदाची हुलकावणी मिळू शकते.
दोन्ही गटात इच्छुकांची यादी मोठी, लाॅटरी कुणाला?
भाजप : पश्चिम महाराष्ट्र : माधुरी मिसाळ. मुंबई : योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक. मराठवाडा : मेघना बोर्डीकर. उत्तर महाराष्ट्र : जयकुमार रावल, देवयानी फरांदे. विदर्भ : संजय कुटे.
शिवसेना : पश्चिम महाराष्ट्र : अनिल बाबर, प्रकाश आबिटकर. मुंबई : यामिनी जाधव. कोकण : योगेश कदम, भरत गोगावले. मराठवाडा : संजय शिरसाट. उत्तर महाराष्ट्र : चिमणराव पाटील, सुहास कांदे. विदर्भ : बच्चू कडू, संजय रायमूलकर, संजय गायकवाड.
मिशन लोकसभेला पूरक ठरणाऱ्यांना संधी
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने ‘लोकसभा मिशन ४५’ डोळ्यासमोर ठेवले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी जे नेते फायदेशीर ठरू शकतात त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते. विशेषत: प्रथम निवडून आलेल्या व मतदारसंघात प्रभावी असलेल्या चेहऱ्यांना पसंती देण्यात यावी, असे दिल्लीतून निर्देश आहेत. ‘‘वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू देण्याचे निर्देश अमित शाहांनी दिल्याची माहिती खरी आहे का?’’ असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर आमदार भरत गोगावले म्हणाले, ‘‘त्यांनी जे सांगितलेय ते चुकीचे नाही. तशी काही स्ट्रॅटेजी असू शकते, पण वाचाळवीर कोण हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ठरवतील.’’
वृत्तसंस्था