कोयता गँगचा पुन्हा धुसगूस
पुणे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पोलीसांनी अनेक वेगवेगळ्या युक्त्या करून पाहिल्या. मात्र तोडफोडीच्या घटना थांबताना दिसतच नाहीत. पुण्यातील सहकारनगर पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली होती. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा भारती विद्यापीठ हद्दीतही टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे.
मधुकर उर्फ अप्पा ग्यानबा भिलारे (वय ४७), आकाश नानासाहेब गरवडे (वय २७), अमित उत्तम भिलारे (वय ३६), फिरोज हसन शेख (वय २४), मुस्तफा मेहबूब शेख (वय २१, सर्व रा. भिलारेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भिमाजी भिकाजी सावंत (वय ३३, रा. ओमसाई निवास, भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी भिलारे, गरवडे, शेख आणि साथीदार ओम साई निवास सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी शिवीगाळ केली. साेसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या दोन मोटारी, रिक्षा, दुचाकी, तसेच टँकरवर दगडफेक केली. कोयते आणि बेसबाॅल स्टीक उगारून दहशत माजविली.
दरम्यान, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही रविवारी सायंकाळी अल्पवयीन टोळक्यानी वाहनांची तोडफोड केली. धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरातील शांतीनगर वसाहतीत दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी लाकडी दांडक्याने आणि दगडाने ५ ते ६ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आता मोक्का अंतर्गत करावाई करण्यात आली आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरात तब्बल २६ गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.