दारूच्या नशेतील स्कॉर्पिओ चालक अल्पवयीन मुलाने तीन वाहनांना उडवले; आरोपीचे वडील लष्करात जवान

दारूच्या नशेतील स्कॉर्पिओ चालक अल्पवयीन मुलाने तीन वाहनांना उडवले; आरोपीचे वडील लष्करात जवान

रिक्षाचालकाचा मृत्यू; दापोडीतील घटना

सीविक मिरर ब्यूरो

लष्कराच्या दिघीतील तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव स्कॉर्पिओ चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. १६) रात्री पावणे दहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे

एमएसईबी ऑफिससमोर घडला. अल्पवयीन मुलाचे वडील लष्करात जवान असून आसाम सीमारेषेवर कार्यरत आहेत. 

पुण्यात कल्याणीनगर येथे बिल्डरच्या अल्पवयीन पुत्राने पोर्शे या अलिशान कारखाली दोघांना चिरडून ठार मारले होते. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. मात्र, या घटनेनंतरही असे प्रकार वारंवार घडत आहेत. 

अमोद कांबळे (वय २७, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मूर्तजा अमीरभाई बोहरा (वय ३२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे वय १७ वर्षे १० महिने आहे. आरोपी मुलगा मुळचा आसामचा असून तो दिघीतील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान असून आसाम सीमारेषेवर कार्यरत आहेत. अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या स्कॉर्पिओ कारमधून भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. त्याने दारू प्राशन केली होती. त्याच्यासमवेत त्याचा एक मित्रही कारमध्ये होता.

 

अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता. असे असताना दारू पिऊन तो भरधाव वाहन चालवित होता. पुणे - नाशिक महामार्गावर भोसरीतील महावितरणच्या

कार्यालयासमोर मुलाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्ता दुभाजकावर चढली आणि विरूद्ध बाजूला गेली. याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणार्‍या रिक्षा आणि दोन दुचाकींना भरधाव कारने ठोकरले. त्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. आरोपी अल्पवयीन

मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. फौजदार पंकज महाजन तपास करीत आहेत.

--

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest