संग्रहित छायाचित्र
वानवडी येथील भैरोबा नाला परिसरात टोळक्याने कोयते आणि दांडक्यांनी दहशत माजवली. टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो आणि दुचाकींसह नऊ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मयुर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुरुवारी दुपारी सेंट पॅट्रीक चर्चजवळील चिमटा वस्तीत टोळके शिरले. हातात कोयते आणि दांडके घेऊन त्यांनी रहिवाशांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांनी भागातील वाहनांची तोडफोड करत शिवीगाळही केली.
घटनेदरम्यान मयुर गायकवाड घराबाहेर आले असता, टोळक्याने त्यांनाही धमकावले. "आम्ही या भागातील भाई आहोत, कोणी मध्ये पडल्यास जिवे मारू," अशी धमकी देत टोळके पसार झाले. जाताना त्यांनी कालव्याजवळ लावलेल्या दुचाकी आणि रिक्षांची तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या सहाय्यक फौजदार कुंभार या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. वाहनांची तोडफोड आणि दहशत माजविण्याची घटना घडल्याने वानवडीतील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत.