संग्रहित छायाचित्र
पुणे : तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या शासकीय कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मृतदेहाचे हे तुकडे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फेकण्यात आले. पोळेकर सिंहगड पायथा परिसरात फिरायला (मॉर्निंग वॉक) गेलेले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. डोणजे, सिंहगड पायथा) असे खून झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देविदास थोरात (वय २४, रा. बेळगाव, कर्जत, जि. अहिल्यानगर), रोहित किसान भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी असलेला गुंड योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय २४, रा. डोणजे, ता. हवेली) पसार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळेकर हे माजी उपसरपंच आहेत. तसेच, त्यांचा कंत्राटदार म्हणून व्यवसाय देखील आहे. ते नेहमी सकाळी फिरायला जात असत. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले होते. मात्र, सकाळचे दहा वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
बाबू भामे याने काही दिवसांपुर्वी पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडे जग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. दरम्यान, पोळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिला होता. त्यामुळेच भामे याने त्यांचे अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. हा तपास सुरू असतानाच अपहरण झाल्याच्या दोन दिवसानंतर खडकवासला धरण परिसरात ओसाडे गावच्या हद्दीत पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.
आरोपींपैकी एक असलेला रोहित भामे हा मुख्य सूत्रधाराचा भाऊ आहे. तर, आरोपी शुभम आणि मिलिंद हे सिंहगड पायथा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतात. भामे याने या दोघांना पैशांचे आमिष दाखवले होते. त्यातूनच हा खून घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.