संग्रहित छायाचित्र
पुणे : शाळेच्या वार्षिक समारंभाच्या नियोजनावरुन नववीमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन मुलांच्या भांडणात झाले. या वादातून एका विद्यार्थ्याचा त्याच्या वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्यात आला. खळबळ उडवून देणारी ही घटना मांजरीमधील एका शाळेत घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ वर्षीय जखमी मुलावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पोलिसांनी १४ वर्षीय विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जखमी मुलाने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीतील एका शाळेत जखमी आणि आरोपी मुलगा इयत्ता नववीमध्ये शिकतो. हे दोघेही एकाच वर्गात आहेत. शाळेमध्ये सध्या वार्षिक समारंभाचे वातावरण आहे. शाळेत त्याचे नियोजन सुरू आहे. या वार्षिक समारंभामध्ये विद्यार्थी आपापली कला सादर करतात. या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये सुरुवातीला वाद झाला होता. त्यानंतर, हे प्रकरण मिटले होते.
दरम्यान, मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जखमी मुलगा वर्गात बसलेला होता. आरोपी मुलगा त्याच्या पाठीमागून गुपचूप आला. त्याच्या हातामध्ये काचेचा तुकडा होता. या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. काही कळायच्या आतच मुलाच्या गळ्यातून रक्ताची धार सुरू झाली. वर्गातील घाबरलेल्या सर्व मुलांनी आरडाओरडा सुरू केला. हल्ला झालेल्या मुलाने घाबरून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. दरम्यान, आरोपीने जखमीला ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात धावले. घडलेला प्रकार आणि रक्त पाहून शिक्षक देखील घाबरले. जखमी मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.