संग्रहित छायाचित्र
'आम्ही इथले भाई आहोत, आता जेलमधून सुटून आलो आहोत. आम्हाला दारू प्यायला दोनशे रुपये दे' असे म्हणत बाप लेकांना दगड व काठीने जबर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
याप्रकरणी विवेक उर्फ विकी तेलंग आणि पियुष भिसे (दोघे रा. लोणी काळभोर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संभाजी सोपान काळभोर (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. काळभोर आणि त्यांचा मुलगा हे रस्त्याने चालत होते. त्यावेळी विकी आणि पियुष या दोघांनी त्यांना अडवले. दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे २०० रुपयांची मागणी केली. 'आम्ही आत्ताच जेलमधून आलो आहोत. आम्ही लोणी लोणी काळभोर येथील भाई आहोत. पैसे दे नाहीतर, तुला आम्ही सोडणार नाही' अशी धमकी त्यांना दिली.
काळभोर यांनी पैसे नाहीत असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी चिडून त्यांच्या मुलाला हाताने आणि काठीने मारहाण केली. आरोपी भिसे याने एक दगड उचलून काळभोर यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.