“आम्ही येथील भाई”, हप्ते वसुलीसाठी कोयते फिरवित दहशत माजविणाऱ्या जुन्नी टोळीवर मोक्का
‘आम्ही येथील भाई’, म्हणत हप्ते वसुलीसाठी धमकावत खुनाचा प्रयत्न करत कोयते फिरवित दहशत माजविणाऱ्या हडपसर परिसरातील अक्षयसिंग जुन्नी टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केलेली ही ५१ वी मोका कारवाई आहे.
अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय २२ वर्षे, रा. बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर) या टोळीप्रमुखासह कुलदिपसिंग ऊर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१ वर्षे, रा. बिराजदारनगर, हडपसर), विशाल ऊर्फ मॅक्स किशोर पुरेबीया (वय २२ वर्षे, रा. जुना म्हांडा कॉलनी बि.नं. १६ रुम नं. १० वेदवाडी, हडपसर) अशी मोका लावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर परिसरात फ्लॅक्स व बॅनर लावण्याचे काम करावयाचे असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला तुला हप्ता दयावा लागेल, असे म्हणून त्यांनी एकाला धमकाविले होते. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर दोन्ही हात पाठीमागून पकडून, तुला फार मस्ती आली आहे, तु कसा हप्ता देत नाही ते बघतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. धारदार शस्त्राने मारून जखमी केले. आम्ही येथील भाई आहोत, असे म्हणत कोयते हवेत फिरवून दहशत माजविली.
संघटितपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी मोका लावण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.