तडीपार गुंडाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
पुण्यातील वानवडी येथील सय्यदनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात तडीपार गुंड अजीम वजीर शेख याचा खून करण्यात आला होता. गुरुवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ५ जणांना अटक केली आहे.
सादिक अब्दुल करीम शेख, अनिस सादिक शेख, शाकीर कादीर सय्यद, मोहसीन जावेद सय्यद आणि शहाबाज कादीर सय्यद (सर्व रा. सय्यदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील दोन गटांतील तरुण एकमेकांचे नातेवाईक आहेत. गुरूवारी रात्री लहान मुलांमध्ये भांडण झाले होते. तो वाद मिटविण्यासाठी नातेवाईक गुरुवारी रात्री जमले होते. अजीम शेख हा तडीपार गुंड होता. वाद मिटविण्यासाठी नातेवाईक जमले असताना अजीम देखील त्याठिकाणी आला.
मात्र, यावेळी अजीमने अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन अजीमचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. वानवडी पोलीसांनी आरोपींविरोधात कलम ३०२, ३०७, १४३, १४४ आणि आयपीसीच्या इतर संबंधित कलम आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५, ४ तसेच फौजदारी प्रक्रिया (सुधारणा) कायद्याचे कलम ७, ३७ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर वानवडी पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे म्हणाले, “आम्ही याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही फरार गुन्हेगारांना लवकरच अटक करू.”