पुण्यात तोडफोडीचे सत्र सुरूच, महर्षीनगरमधील ८-९ वाहनांची तोडफोड
पुण्यामध्ये टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील महर्षीनगर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमध्ये ८ ते ९ वाहनांचे नुकसान झाले आहे.
पुण्यातील स्वारगेट पोलीस चौकीच्या हद्दीतील महर्षीनगर हा परिसर येतो. रविवारी मध्यरात्री अज्ञात टोळक्यांनी तब्बल ८ ते ९ चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तोडफोडीनंतर टोळके घटनास्थळावरून पळून गेले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टोळक्यांचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये दोन दिवसांपुर्वीच एका टोळक्याने दुचाकी तलवार, कोयते आणि काट्यांच्या साहाय्याने फोडल्या होत्या. जवळपास दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले होते. अनेक वाहनांचे हेडलाईन्स फोडण्यात आले. तर काही ठिकाणी दुचाकीच्या पेट्रोलच्या टाक्यांवर कोयता आणि तलवारीने घाव घालण्यात आले होते. या सोबतच काही वाहनांचे टेल लॅम्प देखील तोडण्यात आले होते.