आळंदी रोड पोलीस चौकी
पुण्यात फसवणुकीचे प्रकार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आळंदी रोड येथे पुन्हा एकदा असाच फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. आळंदी येथील मरकळ रोड परिसरात असणाऱ्या हिताची एटीएम सेंटरमध्ये गोपनीय पिनची माहिती घेत एका वृद्धाच्या बँक खात्यामधून तब्बल ६० हजार रुपये लंपास केले आहेत.
सुरेश नारायण बागड (वय ६२) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी एका अज्ञात भामट्या विरोधात आळंदी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरेश हे आपल्या खात्यातील उर्वरित रक्कम तपासण्यासाठी आळंदी मरकळ रोडवरील एटीएम सेंटरमध्ये गेले होते. यावेळी पाठीमागे उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची गोपनीय पिनची माहिती करून घेतली.
त्यानंतर आपल्या जवळ असणारे एटीएम कार्डची बदली करून त्यांच्याकडील एटीएम कार्ड स्वतः कडे घेतले. एटीएमची अदलाबदल होताच बागड यांच्या बँक खात्यामध्ये असणारी ६० हजार रुपयांची रक्कम एटीएम कार्डद्वारे भामट्याने काढून घेतली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत आळंदी रोड पोलीस ठाण्यात सुरेश बागड यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलीस याबाबतचा पुढील तपास करत या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.