संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गुन्हे शाखेच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यामधील १८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हे आदेश दिले. आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून करण्यात आला. आंदेकर यांची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाला होता. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने नाना पेठेत खून केला होता. आखाडे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते.
दरम्यान, तपास अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी विशेष न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात २२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. या खुनाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह साथीदार येरवडा कारागृहात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांची आहे. मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांपर्यंत वाढविता येते, असे सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितले.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा
आंदेकर खून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. या तपासाला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी केली जात आहे, तसेच संघटित गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्ती, मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण, आरोपींचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आरोपींची येरवडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे. साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे. सखोल तपासासाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.