संग्रहित छायाचित्र
कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे. तोतया डॉक्टारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. अशाच एका तोतया डॉक्टरला खडकी न्यायालयाने दणका दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी तोतया डॉक्टरला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
मीलनकुमार अमर ठाकूर (वय ३४, रा. धानोरी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे शिक्षा सुनावलेल्या तोतया डॉक्टरचे नाव आहे.
ठाकूर वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करत होता. याबाबतची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आली होती. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा उमेश गलांडे यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी कारवाई करून ठाकूरला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या दवाखान्यात औषधांचा साठा सापडला होता.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत मारुडे यांनी या प्रकरणाचा तपास करून ठाकूरविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून साहाय्यक सरकारी वकील सायली ठोकळ यांनी बाजू मांडली. साहाय्यक फौजदार पाटील, हवालदार कोळप आणि पाटील यांनी न्यायालयीन कामकाजात साहाय्य केले. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ठाकूरला दोषी ठरवून त्याला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.