संग्रहित छायाचित्र
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात घडली.
संतोष पांडुरंग माळवदकर (वय ४७, रा. पिसोळी ग्रामपंचायतीसमोर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे. सिंहगड सिटी स्कूलचे संचालक धनंजय तुकाराम महाडिक, संस्थेतील वाहतूक पर्यवेक्षक दौलत दत्तात्रय ढोक, विजय संपत कुंभार यांना दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत संतोष माळवदकर यांची पत्नी सुनीता (वय ४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष माळवदकर सिंहगड सिटी स्कूलमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात लावलेली बस पाणी मारून स्वच्छ करत होते. त्यावेळी बसमधील कॉम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का माळवदकर यांना बसला. विजेचा धक्का बसल्याने माळवदकर बेशुद्ध पडले. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सदोष वायरमधून विजेचा धक्का बसून पतीचा मृत्यू झाला. बसची देखभाल न केल्याने दुर्घटना घडली. दुर्घटनेस संस्थेतील संचालक तसेच पर्यवेक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.