संग्रहित छायाचित्र
स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने एनआयबीएम रोडवरील ‘आयरिन स्पा’वर छापा टाकत मॅनेजर आणि स्पा मालकाला अटक केली आहे.
मॅनेजर शिव राजेश भोसले (वय २१, रा. सैनिक विहार, एनआयबीएम पोस्ट ऑफिस रोड) आणि स्पा मालक निखील राजेंद्र नाईक (वय २६, रा. ग्रीन पार्क सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रोडवरील आयरिन स्पा येथे पीडित मुलींना वेश्या व्यवसायाकरीता प्राप्त करून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठविला. त्याने खात्री करून तसा पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आयरिन स्पावर छापा टाकला. स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वत:ची उपजीविका चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मॅनेजर व स्पामालकाला अटक केली. त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचे तीन मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.