संग्रहित छायाचित्र
विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरालगत असलेल्या लोणी काळभोरमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा चार जणांनी विनयभंग केल्याची घटना शनिवार (३० नोव्हेंबर) रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे, तर लोणी काळभोर पोलिसांनी तीन आरोपींना तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे. पीडिता ही १४ वर्षाची असून ती लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पीडिता आणि चौघांपैकी एकाची स्नॅप चॅटवर ओळख झाली. त्यानंतर दोघे त्या ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू लागले. त्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो तिच्या नकळत काढले व त्याच्या मित्रांना पाठवून दिले.
त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेला फोटो दाखवून मैत्री करण्यास भाग पडले. व त्यानंतर ते चौघे तिला वारंवार त्रास देऊ लागले. या त्रासामुळे ती मानसिक दबावाखाली गेली. आपली मुलगी सतत दबावाखाली आहे हे लक्षात येताच आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता वरील चार जण त्रास देत असल्याचे तिने सांगितले.
सदर बाब लक्षात येताच तिला घेऊन आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि चौघांविरुद्ध तक्रार दिली. पोलीस ठाण्यात विनयभंगासह पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना एका तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत, तर यातील एकजण फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.