कोयता गँगनंतर तोयता पोलीस गँग सक्रिय, ५ लाखाच्या मुद्देमालासह चार जणांना अटक
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या तोडफोडीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीसांनी अखेर गुरूवारी कोयता गँगमधील आरोपींची धिंड काढली आहे. मात्र, पुणे पोलीस टोळक्यांचे तोडफोडीचे प्रकार मोडीत काढीत नाहीत तोच दुसरीकडे तोयता पोलीस गँग सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका घटनेत पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी थेट इंडस्ट्रीयल कंपनीमधील पार्टची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पोलीसांनी केली आहे.
मंगेश युवराज कदम (वय २१, रा.से.नं.४, लांडगेवस्ती, अनिल फुगे यांचे रूममध्ये, भोसरी, पुणे), अनिकेत उर्फ अनिल कैलास कदम (वय २३, रा. झपकेचाळ, ओमसाई किराणा स्टोअर्स जावळ, लांडगेवस्ती, भोसरी, पुणे), समीर मंहमद रफीक इनामदार (वय २२, रा. शिंदे निवास, अंजलीनगर, गल्ली क्रमांक ३, कात्रज, पुणे) आणि अभिजीत धनाजी खाडे (वय २१, रा. गणेश मंदिराचे समोर, भगतवस्ती, भोसरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस गस्त घालत असताना पिंपरी चिंचवडमधील जाधववाडी परिसरात चोरटे चोरीचा माल घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी राम मंदिर मैदान परीसरामध्ये सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एक रिक्षा, रिक्षामध्ये महिंद्रा कंपनीचे गेअरचे १४४ जॉब, दोन दुचाकी मोटार सायकली, मोबाईल व एक आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसंन्स, एटीएम कार्ड असा एकुण ०५ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, यातील आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या महिंद्रा कंपनीचे गेअरचे १२ कॅरेटमधील १४४ जॉब चोरीबाबत चिखली पोलीस ठाण्यात कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपींकडील मोबाईल व एक आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, डेबिट कार्डबाबत सखोल तपास करता त्यांनी कुदळवाडी परीसरामध्ये एका इसमास पोलीस असल्याचे सांगून दमदाटी करून हा मुद्देमाल चोरी केल्याचे उघड झाले. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात कलम ३९२, १७०, १७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
याशिवाय, आरोपी समीर मंहमद रफीक इनामदार याचे विरूध्द राजगुरूनगर पोलीस ठाण्यात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये तो जामीनावर बाहेर आहे. तर आरोपी मंगेश युवराज कदम याच्या विरूध्द भोसरी पोलीस ठाण्यात कलम ३८०, ४५७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये तो देखील जामीनावर बाहेर असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.